महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळाबाई आहे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी पोरबंदर या ठिकाणी झाला. 2 ऑक्टोंबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस भारतात “गांधी जयंती” म्हणून साजरा केला जातो. आणि जगभरामध्ये “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन” म्हणून साजरा केला जातो. गुजरात मध्ये जन्मलेल्या गांधींनी लंडन येथे वकिलीचे शिक्षण घेतले. ते 21 वर्ष दक्षिण आफ्रिकेत कुटुंबासोबत राहिले.
महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती
महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला ते स्वतः देखील याच तत्त्वानुसार जगले आणि इतरांनाही तसे करावे असे सुचवले. 1920 ते 1948 या कालखंडाला गांधीयुग असे म्हटले जाते. कारण या काळात भारतीय राजकारण गांधीमय बनले होते. टिळकांच्या मृत्यूनंतर गांधी काँग्रेस चळवळीचे सर्वेसर्वा बनले. त्यांनी भारतीय राजकारणाला नवे वळण दिले. समाजकारण अर्थकारण राजकारण हे सर्व एकाच जीवनाची अंगे आहेत ती एकमेकांपासून अलग करता येणार नाहीत असे गांधीजींचे मत होते. 1920 च्या डिसेंबर महिन्यापासून त्यांनी असहकार चळवळ सुरू केली. भारतातील ब्रिटिश राजवट अन्यायकारक आहे ती येथे चालू राहण्यासाठी भारतीय मदत करतात. अशा प्रकारचे मदत म्हणजे अन्यायाला मदत करणे होय. मूठभर ब्रिटिश या 40 कोटी लोकसंख्या असलेल्या विशाल देशावर भारतीयांच्या मदतीशिवाय राज्यकारभार करूच शकत नाहीत असे गांधीजींचे मत होते. त्यामुळे या शासन यंत्रणेवर असहकार करण्याचे आवाहन त्यांनी भारतीय जनतेला केले सरकारी नोकऱ्यांचा राजीनामा द्या. सरकारी न्यायालयात वकिली करू नका. सरकारी न्यायालयात खटले देऊ नका. सरकारी शाळा, महाविद्यालय यामध्ये शिक्षण घेऊ नका असे जनतेला आव्हान करून स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार आणि परकीय मालावर बहिष्कार असा राजकीय कार्यक्रम त्यांनी जाहीर केला. त्यांचा अहिंसात्मक मार्गावर भर असल्यामुळे चौरीचौरा येथे जमावाने पोलीस चौकीवर केलेला हल्ला आणि त्यात झालेल्या 22 पोलिसांचा मृत्यू या घटनेमुळे गांधी व्यथित झाले. त्यांनी असहकाराची चळवळ मागे घेतली.
असहकार चळवळीमुळे प्रथमच भारतीय राजकारणात स्त्रियांना प्रवेश मिळाला. गांधींचे नेतृत्व जनतेने व सरकारने मान्य केले. या चळवळीने लोकांना निर्भीड बनविले. 1930 मध्ये गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. मिठाचा सत्याग्रह करून अन्यायकारक कायद्यांना सनदशीर मार्गाने विरोध करण्याचे नवे तंत्र गांधीजींनी भारतीयांना दिले. देशातील सर्व तुरुंग भरून गेले. गांधींनी तुरुंगाची तीर्थस्थाने बनवली. या चळवळीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जगभरातील वार्ताहर स्तंभित झाले. 1931 मध्ये गांधींनी गोलमेज परिषदेत भाग घेतला. परंतु ब्रिटिशांच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून गांधींनी भारतात परत येण्याचे ठरवले व ते भारतात आले. सविनय कायदेभंगाची चळवळ पुन्हा सुरू झाली. गांधीजींना अटक करून तुरुंगात टाकले सरकारने जातीय निवाडा जाहीर केला. त्यानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. त्या कृतीचा निषेध करण्याकरता गांधीजींनी तुरुंगात आमरण उपोषण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये करार होऊन (पुणे करार 1932) नुसार दलितांना राखीव मतदारसंघ देण्यात आले. 1935 च्या कायद्यानुसार प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. 1937 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या 8 प्रांतांमध्ये काँग्रेसचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आली. परंतु दुसऱ्या महायुद्धात काँग्रेसला विश्वासात न घेता ब्रिटिश सरकारने भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात प्रवेश करील असे जाहीर केल्यामुळे गांधी नाराज झाले. त्यांनी काँग्रेस मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावयास भाग पाडले. ब्रिटिशांनी हा देश सोडून जावे याकरिता गांधीजींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी चलेजावची चळवळ जाहीर केली. देशभर प्रचंड असंतोष निर्माण झाला सरकारने काँग्रेसच्या पुढार्यांना पकडून तुरुंगात टाकले लोकांनी चळवळ स्वतःच्या हातात घेऊन तिला हिंसक वळण दिले.
त्यानंतरच्या राजकारणात गांधीजींनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे शेवटपर्यंत केले. परंतु जीनांच्या हट्टीपणामुळे त्यांना यश आले नाही. “प्रथम माझ्या देहाचे दोन तुकडे करा आणि नंतर माझ्या देशाचे विभाजन करा” म्हणणाऱ्या गांधींच्या नशिबी अखंड भारताचे भारत आणि पाकिस्तान हे दोन तुकडे पाहण्याचे दुर्भाग्य आले. हिंदू मुस्लिम धर्म देशाच्या आगीत सारा देश होरपळत असताना गांधी दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी नौखलीत येथे गेले होते. ते परत आले असताना नथुराम गोडसे या माथेफिरू ने गोळ्या घालून त्यांना ठार केले. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर- देशातील प्रकाश ज्योत नष्ट झाली आहे भोवताली सर्वत्र अंधार पसरलेला आहे असे भावपूर्ण उद्गार पंडित नेहरूंनी काढले अल्बर्ट आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाने गांधींसारखा महात्मा भारतात जन्माला आला व या पृथ्वीतलावर मानवी देहात अवतरला यावर माझा विश्वास बसत नाही. असे उद्गार काढून विसाव्या शतकातील या महामानवाला श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपित्याच्या निधना बरोबरच गांधी युगाचा अस्त झाला.
Mahatma Gandhi (imp Points )
> कीर्ती मंदिर (पोरबंदर गुजरात) – महात्मा गांधीजींचे जन्मस्थळ
> मनीभवन (मुंबई) – गांधीजी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर येथे लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले आणि दादाभाई नवरोजी यांनी त्यांचे स्वागत केले होते.
> चंपारण्य (बिहार)- 1919 मध्ये गांधीजींनी येथे पहिला सत्याग्रह केला.
> साबरमती आश्रम (गुजरात)- 1917 ते 1930 या काळात गांधीजींचे वास्तव्य येथे होते.
> मदुराई (तमिळनाडू)- 1921 मध्ये गांधीजींनी पाश्चात्य वेशभूषा सोडून धोतराचा पेहराव करण्याचे ठरविले.
> दांडी (गुजरात)- 1930 रोजी मार्च महिन्यात गांधीजींनी येथे दांडी मार्च समाप्त केला.
> सेवाग्राम आश्रम (महाराष्ट्र)- गांधीजींनी येथे मूलभूत शिक्षणाच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले.
> आगाखान पॅलेस (पुणे)- 1942 ते 44 दरम्यान गांधीजींना येथे कैद करून ठेवण्यात आले होते या काळात येथे त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी आणि सचिव महादेव देसाई यांचा मृत्यू झाला.
> बिलिया घाट (कोलकाता)- भारताच्या स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी गांधीजी येथे होते.
> लंडन (ब्रिटन)- येथे गांधीजींनी शिक्षण घेतले होते दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेतला होता.
हे पण महत्त्वाचे वाचा- Savitribai Phule 1831-1897